Saturday, September 1, 2018

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!
राष्ट्रीय पोषण सप्ताह
लेख २.


जन्माला आल्याआल्या देशाचा नागरिक म्हणून मिळणारे हक्क मिळायच्या आधीच बाळाला स्तन्यपानाचा हक्क मिळालेला आहे.प्रत्येक नवजात शिशुच्या त्या हक्काची जबाबदारीने अमलबजावणी करणे किंबहुना त्याकरीता अनुकूल वातावरण उपलब्ध करणे ,हे आईइतकेच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य होय.
नवजात शिशु बाहेर येताच वार गर्भाशयापासून विलग झाली कि गर्भाशय आकुंचन पावते आणि हाच संकेत म्हणजे स्तन्य स्रवण्याचा देखील क्षण असतो. बाळ जन्मल्या जन्मल्या आईच्या छातीवर ठेवले कि सकलिंग रेफ्लेक्स दिसतो. म्हणजे बाळ न शिकवताही आई चे दूध पिण्याचा प्रयत्न करते. अगदी या क्षणापासून पुढचे पूर्ण सहा महिने तरी बाळाला पूर्णपणे आणि भरपूर प्रमाणात स्तन्यपान हि नवजात बालकाच्या पोषणाची गुरुकिल्ली आहे.
पूर्णान्न असलेल्या आईच्या दुधाची उगाच अमृताशी तुलना होत नाही.विविध प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांनी युक्त आईचे दूध हे पहिल्या दिवसापासूनच दिले जावे.सुरुवातीला येणार पातळ अथवा चिकासारखे दूध देखील द्यावे. दूध येत नाही म्हणून लगेच वरचे दूध देणे टाळावे.बाळ जेवढे आईच्या दुधासाठी प्रयत्न करेल तेवढे स्तन्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
सुरुवातीला काही दिवस बाळाला आवर्जून दर दिड ते दोन तासांनी प्रयत्नपूर्वक दूध द्यावे.दोन्हीही स्तनांतील दूध दरवेळेस द्यावे. सुरुवातीला पातळ स्वरूपातील स्तन्य बाहेर येते त्यामुळे प्रत्यके बाजूला कमीत कमीत १५ मिनिटे पाजणे आवश्यक आहे. स्तन्यपान करताना आई ने आपल्या पाठीची अवश्य काळजी घ्यावी अवघडलेल्या अवस्थेत स्तन्यपान करणे टाळावे. अशा वेळेस जर चार चौघात स्तन्यपान देण्याची वेळ आली तर आजूबाजूच्या लोकांची जबाबदारी वाढते.अशावेळेस त्या स्त्री ला अवघडले वाटणार नाही याची काळजी घेणे हे निरोगी मनाचे लक्षण जरूर दाखवा. घरातील मोठ्या स्त्रिया, नर्स यांनी वेळोवेळी योग्य माहिती ,समुपदेशन आणि दिलेला आधार स्तन्यपानाचा मार्ग अजून सुखकर बनवतो आणि आई व बाळ टवटवीत फुलासारखे दिसतात.
स्तन्यपानात येणाऱ्या प्रमुख अडचणींमध्ये अल्प स्तन्य ,अतिप्रमाणात स्तन्य आणि स्तनांत गाठ होणे या होत.
दुध कमी आहे हे कसे ओळखावे?
बाळाचे वजन जर योग्य प्रमाणात वाढत नसेल,तब्येतीची तक्रार नसताना देखील बाळ कुरकुर करत असेल,रात्री सलग काही काळ झोपत नसेल, लघवी कमी करत असेल तर कदाचित दूध कमी आहे असे आपण म्हणू शकतो.
दूध अतिप्रमाणात येत असेल तर स्तन खूप जड होणे, आपोआप स्तन्य वाहत राहणे अथवा बाळा ला पिताना देखील त्रास होणे ,स्तनांमध्ये प्रचंड वेदना आणि स्तन दगडासारखे कठीण होणे असे काही लक्षणे दिसतात. अशा वेळेस बाळाला पाजून झाले कि मॅनुअली स्तनांमधून दूध काढून टाकणे फार गरजेचे असते.

घरातील ज्येष्ठ स्त्रिया अशावेळेस देवासारख्या धावून यायच्या परंतु आज जिथे घरात ती बाई एकटी गोंधळलेली असते आणि घरात जर अनुभवी स्त्री नसेल तर अशा अडचणींना तोंड देणे अवघड होते. याची परिणती पुढे जाऊन स्तनांमध्ये दुधाच्या गाठी तयार होणे, त्याची परिणती गळूत होणे,तो नंतर फोडून अनेक दिवस त्याचे ड्रेसिंग करावे लागणे यात होते. यात ताप येणे ,प्रचंड वेदना, दूध पाजताना अडचण, दूध पाजले नाही तर परत स्तनांमध्ये वेदना आणि गाठी अशी होऊ शकते. यासाठी सुरुवातीपासून स्तन्यपान आणि स्तन्यपानाशी संबंधित सर्व गोष्टींचे समुपदेशन आई, वडील आणि कुटुंबातील व्यक्तींना करणे आवश्यक होय. खेडेगाव असो कि शहर, बाई सुशिक्षित असो कि खेडवळ यासंबंधीचे मार्गदर्शन वेळोवेळी होणे गरजेचंच आहे. योग्य माहिती ,ज्ञान मिळाले कि अंधश्रद्धा, घरगुती चुकीचे उपाय ,दुर्लक्ष अशा गोष्टी टाळल्या जातील.
बाळाचे पोषण करणारे स्तन्य खुद्द देखील पोषक हवे तरच ते बाळाचे नीट पोषण करू शकते. आईच्या दुधाची पोषणक्षमता ती काय खाते यावरच ठरते.आईला झालेले काही आजार आईची मानसिक परिस्थिती याचा देखील स्तन्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. स्तन्यदुष्टी हि अतिशय महत्वपूर्ण संकल्पना आयुर्वेदात आलेली आहे. स्तन्यदुष्टी म्हणजे काय, त्यावर उपाय काय, स्तन्य वाढावे म्हणून कुठला आहार घायला हवा याविषयी उद्या जाणून घेऊ. उद्याचा लेख देखील नक्की वाचा .

लेखिका: डॉ रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद क्लीनिक, बाणेर पाषाण लिंक रोड पुणे
९६२३४४८७९८.



from lactation « WordPress.com Tag Feed https://ift.tt/2MIIJfR
article sponsered by Northern Michigan certified lactation consulting and Mother Hubbards Country Cupboard

No comments:

Post a Comment